मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या 'मन की बात' कार्यक्रमातील आवाहनानंतर रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेऊन मुंबईकरांना आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता मुंबईकरांना लवकरच ईसीएसच्या माध्यमातून रेल्वेचा पास मिळणार आहे. तसेच एटीव्हीएम मशिनसाठी डेबिड कार्डचा देखील वापर करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
तिकिट खिडक्यांवरच्या रांगा कमी करण्य़ासाठी आणि तिकिट खरेदीचे व्यवहार कॅशलेस करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत ईसीएसच्या माध्यमातून रेल्वे पासची सुविधा आणि मोबाईल तिकिटासाठी डेबिट कार्डच्या वापरासंदर्भातील पर्यायांचा विचार सुरु केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर 'मन की बात' या कार्यक्रमानंतर कॅशलेस व्यवहारांचा आग्रह धरला. यावेळी मोदींनी ‘कॅशलेस सोसायटी’बाबतची सविस्तर भूमिका मांडली. ‘कॅशलेस सोसायटी’ हे आपलं ध्येय आहे. कदाचित काही प्रमाणात हे ध्येय पूर्ण होणार नाही. मात्र, किमान ‘लेस-कॅश सोसायटी’पासून ध्येयपूर्तीसाठी सुरुवात आपण नक्कीच करु शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यानंतर लेस-कॅशच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी पुढाकार घेत, ईसीएसच्या माध्यमातून रेल्वे पास ही नवी सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे प्रभूंची रेल्वे सुसाट धावतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.