मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावा. अशी मागणी मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आली आहे. स्मारकासाठी निश्चित केलेल्या महापौर बंगल्याच्या जागेसाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचा दावा पालिकेच्यावतीनं करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्याचा निर्णय चुकीचा असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
या याचिकांमध्ये राज्याच्या मुख्य सचिवांसह मुंबई महापालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना एक रुपया भाडेतत्वावर ३० वर्षांसाठी जागा देणं चुकीचं आहे. तसेच स्मारकाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार असल्यानं तिजोरीवर आणखी आर्थिक बोझा पडणार आहे. असं या याचिकेत म्हटलं आहे.
याशिवाय महापौर बंगल्याची जागा आरक्षित असल्याने त्याचा वाद सुरू आहे. असं असताना विकास आराखड्यात होणारा बदल हा अधिकाराचा गैरवापर आहे. असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. महापौर बंगल्याची जागा सीआरझेडमध्ये येत असून हेरिटेज प्रकारातही येते त्यामुळे या ठिकाणी स्मारक नको असंही याचिकेत म्हणण्यात आलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा वाद निकाली लागण्याची शक्यता
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
28 Sep 2017 05:33 PM (IST)
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा वाद लवकरात लवकर निकाला लागावा यासाठी आता मुंबई महापालिकेनं थेट हायकोर्टालाच विनंती केली आहे. स्मारकाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावा. अशी मागणी पालिकेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -