मुंबई : मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेने केलेल्या मास टेस्टिंग अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या 150 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे.


बसमधून प्रवासी भरभरुन जात होते. शिवाय दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून मास टेस्टिंग मोहीम हाती घेतली होती. ज्या लोकांचा गर्दीशी सातत्याने संपर्क येतो, त्यांची टेस्टिंग या मोहिमेअंतर्गत करण्यात आली. यामध्ये दुकानदार, फेरीवाले, वेगवेगळ्या ठिकाणचे व्यावसायिक, बाजारातील विक्रेते यांची कोरोना चाचणी करण्यात आली.


जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांची चाचणी या मोहिमेअंतर्गत केली. त्यामध्ये आतापर्यंत 150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. टेस्टिंगच्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या कमी असली तरी या 150 जणांचा संपर्क एक, दोन पेक्षा जास्त लोकांशी सातत्याने आलेला आहे, म्हणजेच गर्दीशी आलेला आहे. त्यामुळे चिंता वाढू शकते.


दरम्यान मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून योग्य वेळी पावलं उचलत या 150 जणांना आयसोलेट केलं आहे. त्यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अॅडमिटही केलं आहे. सोबतच या 150 जणांच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली आहे.


मात्र गर्दीशी संपर्क येणाऱ्यांची कोरोना टेस्टिंग करणं आणि ती पॉझिटिव्ह येणं ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढू शकतो.


दुसरीकडे राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद, महापालिका आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


सुपर स्प्रेडर कोण?
किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, फूटपाथवर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक, वेटर्स, विविध घरगुती सेवा पुरवणारे कर्मचारी, वाहतूक व्यवसायातील माल वाहतूक करणारे ट्रक चालक, टेम्पो चालक, रिक्षाचालक, हमाली, रंगकाम, बांधकाम आदी कामे करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरवणारे शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड इत्यादी.