मुंबई : मुंबई आणि ठाण्याचा वेशीवर असलेल्या कोपरी उड्डाण पुलाच्या नव्या मार्गिकेचे काम येत्या दहा दिवसात पूर्ण होणार असण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचे हे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेली वीस वर्षे कोपरी पुलावर वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांची स्वप्न सत्यात उतरणार आहे. 


पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या कोपरी उड्डाण पुलावर बॉटल नेक तयार होत असल्याने दिवस-रात्र प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्यात 22 जून 2017 ला रेल्वे वरील ब्रिज आय आय टी च्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक निष्पन्न झाल्याने या पुलाचे तातडीने पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता होती. अखेर 21 मे 2018 ला या पुलाच्या पुनर्निर्माण याच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलासाठी आम्ही 2015 पासून प्रयत्न करीत आहोत, 2018 साली याचे काम सुरू झाले. मात्र लॉकडाऊनच्या काळात ते संथ गतीने सुरू होते. अखेर 2021 ला कामाने पुन्हा जोर पकडला त्यामुळे 15 जून पर्यंत काम पूर्ण होईल", असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.


या पुलाच्या कामासाठी अनेक अडथळे होते. त्यासाठी वारंवार रेल्वे आणि वाहतूक विभागाकडून परवानगी घेऊन मेगाब्लॉक घेण्यात आले. " मेगा ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेऊन कोपरी पुलाचया कामास प्राधान्य दिल्याने आज हे काम लवकर पूर्ण होत आहे, विद्युत दिवे लावणे, स्लॅब बनवणे अशी बारीक बारीक कामे आता राहिली आहेत, जी लवकरच पूर्ण होतील", असे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 


काय आहे कोपरी पुलाची समस्या?


मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी रेल्वे मार्गावरून जाणारा 4 मार्गिकेचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने 1958 साली उभारला. त्यालाच कोपरी ब्रिज असे नाव पडले. वाहतूक वाढल्याने 1995 नंतर एम एम आर डी ए ने पुलाच्या बाजूला दोन मार्गिका वाढवल्या.
मात्र त्यानंतर ठाणे आणि मुंबई शहराचा प्रचंड विकास झाला, त्यामुळे फक्त चार मार्गिकेचा असलेला कोपरी ब्रिज वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला. त्यामुळे 2016 साली या पुलाच्या विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाली आणि 258 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 


येत्या दहा ते पंधरा दिवसात उर्वरित काम पूर्ण होऊन हा पूल जून महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी शक्यता सांगितले जात आहे. मात्र अजूनही या फुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 1958 साली बांधलेला जुना कोपरी पूल पाडून त्या जागी नवीन पूल निर्माण करण्यात येईल. मात्र त्याचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. असे असले तरी अधिकच्या चार लेन उपलब्ध झाल्याने या पावसाळ्यात कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होणार नाही. यामुळे एक प्रकारे मुंबई आणि ठाणेकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.