मुंबई : प्रत्येक नागरिक कधी ना कधी पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करतो. दुसऱ्या देशात जाण्याचं त्याचं स्वप्नं पूर्ण होणार असतं. परंतु, बहुतेक लोकांना पासपोर्ट मिळवताना फार कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदाच पासपोर्ट काढणाऱ्यांना भ्रष्टाचाराचा पहिला अनुभवही येतो.
सगळ्यात जास्त त्रास हा पोलीस व्हेरिफिकेशनच्या वेळी होतो. काही पैसे काढण्यासाठी 'मी याच घरात राहतो' हे सिद्ध करण्यासाठी बरेच पुरावे मागितले जातात. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागच्या पाच वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2020 एकूण 4,53 913 इतक्या तक्रारी पासपोर्ट पोर्टलवर रजिस्टर झाले आहेत. त्यापैकी 2,79,559 इतक्या तक्रारी इतर वर्गामध्ये टाकल्या आहेत.
पोलीस खात्याशी जास्त तक्रारी
पोलीस व्हेरिफिकेशनबद्दल एकूण 95,899 इतक्या तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. म्हणजेच 20 टक्के तक्रारी या पोलीस खात्याशी संबंधित आहे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर किती कारवाई करण्यात आली. हा प्रश्न विचारला असता पासपोर्ट ऑफिसने उत्तर देण्यास नकार दिलेला आहे. यावरून स्पष्ट होते की या तक्रार प्रणालीचा मोठा उपयोग नागरिकांना होत नाही. 8,632 तक्रारी फक्त पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट आलेला नाही. यासंदर्भात केल्या आहेत. यावरूनच दिसते की पासपोर्ट मिळवताना प्रत्येक स्टेजला लोकांना त्रास होतो.
यंग व्हिसलब्लोअर फाउंडेशनचे संयोजक जितेंद्र घाडगे यांचे म्हणणे आहे की पासपोर्ट मिळवताना पत्ता व्हेरिफाय करायची गरज नसून पोलिसांना फक्त त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रिपोर्ट मागवण्यात यावा तसेच पासपोर्ट पोस्टाने तसेच स्वतः पासपोर्ट ऑफिसमध्ये येऊन घेण्याचा पर्याय सुद्धा असावा, जेणेकरून लोकांना पासपोर्ट वेळेवर मिळू शकेल व भ्रष्टाचारही होणार नाही.