मुंबई : कोरोना लॉकडाऊनमध्ये मुंबईसारख्या गजबजाट असलेल्या मायानगरीत शुकशुकाट दिसून येतोय. यामुळं मुंबईतील रस्त्यांवर मोर, हरिण असे प्राणी दिसू लागले आहेत.


पवई येथील हनुमान टेकडी परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छतातून एक हरीण घरात पडल्याची घटना घडली आहे. हनुमान टेकडी परिसरात राहणाऱ्या सविता सिंग यांच्या घरात हा प्रकार घडला आहे.



सिंग यांच्या घरातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक हे हरीण घराच्या छतावरून पडल्याने त्यांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पॉज-मुंबई एसीएफचे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच याबाबत माहिती वनविभागाला दिली. ही माहिती कळताच वनविभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.




या हरणाला वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी पकडले. या हरणाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारासाठी नेण्यात आलं आहे.  या विभागांमध्ये हरीण डोंगरावरून पडल्याची ही दुसरी घटना आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शांतता असल्याने वन्य प्राण्यांचा वावर रहिवासी वस्तीत वाढला आहे. त्यामुळे वारंवार अशा प्रकारे वन्य प्राणी रहिवासी वस्तीत दिसत असून त्यांचे अपघात होण्याच्या घटना ही वाढल्या आहेत.