मुंबई : इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज (शनिवार 10 जुलै) काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या मोर्चाची फजित उडालेली पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती, त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकं होती. यामुळे वजनाने बैलगाडी मोडल्याने अपघात झाला. या बैलगाडी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः भाई जगताप देखील होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, बैलगाडीचे नुकसान झाले असून बैलांनाही जखम झाली आहे. या घटनेनंतर भाजपकडून सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे.


काँग्रेसच्या या बैलगाडी मोर्चावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही यावर भाष्य केलंय. ते म्हणाले, की राहुल गांधी जिंदाबाद म्हटलं की ते बैलांनाही सहन झालं नाही आणि बैलगाडी खाली पडली, ते माणसांना कसं सहन होईल? भाई जगताप यांनी कोविडच्या नियमाचेही उल्लंघन केलं आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. तर काँग्रेस बैलडाडीच्या आंदोलनात मुक्या प्राण्यांना त्रास दिला. याबद्दल काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंबई शहर पोलीस आयुक्तांकडे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.






'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार! : प्रसाद लाड
काँग्रेस बैलगाडी मोर्चाचा फजती झाल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत खोचक टीका केली आहे. 'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार, असे कॅप्शन देत भाई जगताप मी तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंचं करावं!" असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!, अशी खोचक टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.


PHOTO: काँग्रेसची नागपुरात भर पावसात सायकल यात्रा, सर्व विभागीय मुख्यालयांमध्ये महागाईविरोधात आंदोलन


महागाईविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन
कोरोनाच्या संकटामुळे सामान्य लोक अडचणीत असतानाच भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढल्याने लोकांचे कंबरडे मोडलं आहे. त्यामुळे भाजपने महागाई कमी करावी, या मागणीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे. याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला जात आहे. आजचा मोर्चाही याचाच एक भाग होता.