मुंबई : मुंबईत आज सुद्धा मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या सरकारी लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद आहे. लसींचा पुरवठा नसल्याने काल शुक्रवारी लसीकरण बंद होतं आजही लसीकरण बंद आहे आणि उद्या रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सुद्धा लसीकरण होणार नाही. त्यामुळे सलग तीन दिवस मुंबईत लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लस मिळणार नाही. कोरोनाचं प्रमाण आटोक्यात येत असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना अशा प्रकारे लसीकरण बंद राहणे योग्य नसल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. 


या आठवड्यातील सोमवारी रात्री लसींचा पुरवठा महापालिकेला प्राप्त झाला होता. यामध्ये  95000 लशींचे डोस या आठवड्यातल्या मंगळवार, बुधवार ,गुरुवार या तीन दिवसांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना देण्यात आले.  मात्र त्यानंतर लसींचा पुरवठा झाला नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.


मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार


त्यामुळे जे लाभार्थी आपला पहिला, दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येतात त्यांना लसींचा पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सोमवारी येण्यास सांगण्यात येत आहे. 


एकीकडे देशातील कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता महाराष्ट्र, केरळ या राज्यात निम्म्याहून अधिक कोरोना रुग्ण सद्यस्थितीत आहेत. शिवाय, मुंबईत सुद्धा रोज साडे पाचशे ते सहाशेच्या दरम्यान कोरोना रुग्ण नव्याने आढळतात असताना लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. मात्र लसींच्या पुरवठ्या अभावी नाइलाजास्तव लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहेत.'


Maharashtra Corona Cases : राज्यात शुक्रवारी 10, 458 रुग्णांना डिस्चार्ज, 8,992 रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही


महापालिकेनं काय सांगितलं...


बीएमसीकडून लसीकरण बंद असल्याबाबत सांगण्यात आलं आहे की,  कोविड-19  प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर शनिवार दिनांक 10 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे. तसेच रविवार साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील.  लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे, असं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे.