कल्याण : एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागल्यानंतर डोंबिवलीतल्या स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केलं होतं. पण सत्काराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, हा सोहळा एकनाथ शिंदेच्या सत्कारासाठी शिवसैनिकांकडून आयोजित केला असला, तरी यावर पूर्णपण भाजपची छाप असल्याचे दिसून येत होतं.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे एकमेव नेते उपस्थित होते. तर भाजपकडून कॅबिनेट मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे दोन मंत्री उपस्थित होते.

विशेष म्हणजे, या सत्कार सोहळ्याच्या पत्रिकेवरुन शिवसेना नेत्यांचीही नावं गायब होती. त्यामुळे मंचावर सेनेपेक्षा भाजपच्या मंत्र्यांना स्थान देऊन एकनाथ शिंदेंनी सेनेतल्या अंतर्गत विरोधकांना इशारा दिल्याची चर्चा सध्या ठाणे जिल्ह्यात रंगली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.