मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2019 08:54 AM (IST)
या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यास मान्यता देण्यात आली असून या निर्णयामुळे एमएमआरडीए क्षेत्रात दोन हजार चौ.कि.मीने वाढ होणार आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यास मान्यता देण्यात आली असून या निर्णयामुळे एमएमआरडीए क्षेत्रात दोन हजार चौ.कि.मीने वाढ होणार आहे. बृहन्मुंबई व सभोवतालच्या प्रदेशांमध्ये झपाट्याने होणारी लोकसंख्येची वाढ व त्या अनुषंगाने विकसनशील क्षेत्राचे सुयोग्य नियोजन व नियोजित विकास व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 1967 ला अधिसूचित झालेल्या मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र 3965 चौरस किलोमीटर होते. त्यानंतर त्याची हद्द वाढवून ते 4355 चौरस किलोमीटर करण्यात आले. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे ही हद्द वाढविण्याची मागणी होती. या प्रकल्पांमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-सूरत शीघ्रगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालघर जिल्हा व उद्योग केंद्र, मुंबई पारबंदर प्रकल्प, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, विविध मेट्रो प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या निर्णयामुळे एमएमआरडीएच्या एकूण क्षेत्रात दोन हजार चौ.किमी इतकी वाढ होणार आहे.