मुंबई : तंबाखूसारख्या दिसणाऱ्या ‘मॅजिक मिक्स’ची व्यसन सोडविण्यास मदत होत आहे. बेस्टच्या वैद्यकीय विभागाने हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपायामुळे 5000 कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्त केले आहे.

अनेकदा बेस्ट चालकांना तासनतास बस चालवावी लागते. यावेळी रस्त्यावर असलेल्या वाहतूक कोंडीला ही त्यांना सामोरे जावे लागते आणि यात मग चालक तंबाखू चघळताना अनेकदा दिसतो मात्र या कर्मचाऱ्यांना जरी हे व्यसन सोडायचे असले तरी ते शक्य होत नाही. यामुळे बेस्टच्या आरोग्य विभागाने मॅजिक मिक्स या नावाचा पदार्थ तयार करून 5000 बेस्ट कर्मचाऱ्यांना या पदार्थाच्या माध्यमातून तंबाखूमुक्त केले आहे.

कसा आहे हा मॅजिक मिक्स पदार्थ
हा पदार्थ तंबाखू सारखा दिसतो. जिरे, ओवा, दालचिनी आणि लवंग या पदार्थाची पूड असते. यामध्ये चुना म्हणून तांदळाचे पीठ वापरले जाते.

‘तंबाखूमुक्त बेस्ट’ हा कार्यक्रम 2013 साली बेस्टने हाती घेतला. सध्या बेस्टमधील 90 टक्के कर्मचाऱ्यांना तंबाखूचे व्यसन जडलेले आहे. यातील बहुतांश जणांचे व्यसन हे शारीरिकपेक्षाही मानसिकदृष्ट्या अधिक आहे. मात्र आता या मॅजिक मिक्स खाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तंबाखू खाल्ल्याचे समाधान मिळते.  त्यातच दालचिनी तंबाखूची नशा सोडल्यानंतर होणाऱ्या परिणामांपासून दूर ठेवते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तंबाखू सोडणे शक्य झाले असून एकूण 5000 कर्मचारी आता तंबाखूमुक्त आहेत.

या उपक्रमासाठी बेस्टच्या आरोग्यविभागाचे डॉ. अनिल कुमार सिंघल यांचा  मोलाचा वाटा आहे.