मुंबई : अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर ही अंबरनाथ शहराची खरी ओळख.. दरवर्षी श्रावण सोमवारी या मंदिरात भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. महाशिवरात्रीला तर अंबरनाथमध्ये ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा भरते. या दिवशी शिवमंदिरात दर्शनासाठी अक्षरशः लाखो भाविक येतात. मात्र भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हेच शिवमंदिर यंदाच्या श्रावण महिन्यात मात्र पूर्णपणे बंद राहणार आहे, आणि याला कारणीभूत ठरलाय कोरोनाचा वाढता कहर..


कोरोना वाढू लागल्यानंतर सगळी प्रार्थनास्थळं बंद करण्याचे आदेश सरकारनं दिले. त्यानुसार शिवमंदिरही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. केवळ मंदिराचे पुजारी मंदिरात जाऊन नित्यपूजा करत असतात. मात्र किमान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सुरक्षिततेचे उपाय करून मंदिरात प्रवेश दिला जाईल, अशी भाविकांची अपेक्षा होती. मात्र आता मंदिर श्रावण महिन्यातही बंद राहणार असल्याचं मंदिराचे परंपरागत पुजारी असलेले विजय पाटील यांनी जाहीर केलं आणि भाविकांचा मोठा हिरमोड झाला. मात्र हा निर्णय भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आणि गरजेचाही आहे.


अंबरनाथचं शिवमंदिर हे शिलाहार राजा मम्बवाणी यानं इ. स. 1060 साली उभारलं. या मंदिरातल्या महादेवाला अंबरेश्वर म्हणून संबोधलं जातं. त्यावरूनच अंबरनाथ हे शहराचं नाव पडलं आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून अंबरनाथच्या शिवमंदिराकडे पाहिलं जातं. हेमांडपंथी बांधकाम असलेल्या शिवमंदिराचा युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या (वर्ल्ड हेरिटेज) यादीतही समावेश आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर देवीदेवतांच्या मूर्ती आणि सुंदर नक्षीकाम केलेलं असून यावरून मंदिराच्या उत्कृष्ट स्थापत्यकलेचा प्रत्यय आपल्याला येतो. गेल्या काही वर्षांमध्ये या मंदिराची काहीशी पडझड होऊ लागली असून त्याकडे पुरातत्व खात्यानं वेळीच लक्ष देण्याची मागणी आजवर अनेकदा करण्यात आली आहे. शहराला लाभलेला हा वारसा टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.


अंबरनाथच्या शिवमंदिराला गेल्या 960 वर्षांमध्ये कधीही कुलूप लागलं नव्हतं. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलंय. त्यामुळे यंदा भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच महादेवाला हात जोडावे लागणार आहेत. दरवर्षी श्रावण महिन्यात मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांच्या वतीने मंदिराच्या आवारात तब्बल महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवाय प्रत्येक सोमवारी हजारो भाविक भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मंदिर हे इतिहासात पहिल्यांदाच बंद करण्यात आलं आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचं भाविकही स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे.


Solapur Siddharameshwar Temple | श्रावण महिन्यानिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई