ठाणे : पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठाण्यात बेड्या ठोकल्या आहेत. तरुणाला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचा बनाव दोघा आरोपींनी रचला होता.
आरोपी पत्नी प्रिया नाईक पती गोपी आणि मुलीसह ठाण्यातील गायमुख भागात राहत होती. प्रियाचे आरोपी महेश गोविंद कराळेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा कट प्रिया आणि महेश यांनी रचला.
गोपीची हत्या करुन त्याचा मृतदेह बाईकवरुन त्यांनी ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेला. गोपीला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचं सिव्हील रुग्णालयात सांगून दोघांनी पोबारा केला.
डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली असता शरीरावरील जखमा या अपघाताच्या नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. संशय बळावल्याने त्यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, तेव्हा गळा आवळून आणि डोक्यावर प्रहार केल्यामुळे गोपीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
विशेष म्हणजे हत्येपूर्वी आरोपींनी गोपीला झोपेच्या जवळपास तीस गोळ्या आणि इंजेक्शन दिलं होतं. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवलं. गोपीच्या डोक्यावर प्रहार करुन पूर्वनियोजित कटानुसार हत्या केल्याचं निष्पन्न झालं.
पतीला सिव्हील रुग्णालयात सोडून आरोपी पत्नी प्रिया प्रियकर महेशसोबत माथेरानला निघून गेली. गोपीच्या घरी पोहचलेल्या पोलिसांना बाथरुममध्ये रक्ताचे पुसलेले डाग आढळले. आरोपी पत्नी घरी नसल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यात शवविच्छेदनाच्या अहवालाने सर्व प्रकार समोर आला.
कासारवडवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन अपघाताचा बनाव उघड केला. पोलिसांनी आरोपी पत्नी प्रिया आणि प्रियकर महेश कराळे यांना माथेरानमधून हत्येच्या 72 तासात अटक केली.
ठाण्यात पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिचा प्रियकर अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2019 12:18 AM (IST)
गोपीची हत्या करुन त्याचा मृतदेह पत्नी प्रिया आणि तिचा प्रियकर महेशने बाईकवरुन ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेला. गोपीला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचं सिव्हील रुग्णालयात सांगून दोघांनी पोबारा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -