मुंबई : महानगरपालिकेने मुंबईकरांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. पालिकेच्या रुग्णालयात 'आपली चिकित्सा' या उपक्रमाखाली नवी योजना राबवली जाणार आहे. या योजनेद्वारे मुंबईकरांना पालिकेच्या रुग्णालयात 101 विविध प्रकारच्या चाचण्या 100 रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे.

या योजनेचा फायदा पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिबांना होणार आहे. पालिकेची रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्येही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 2 जानेवारी रोजी स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे. या उपक्रमासाठी शहर आणि उपनगरांसाठी थायरोकेअर आणि मेट्रोपॉलिस या प्रयोगशाळांची निवड करण्यात आली आहे.

चार वर्षांच्या कंत्राटासाठी पूर्व उनगरात मेट्रोपॉलिस हेल्थ केअर लिमिटेड काम करणार असून यासाठी 26.86 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये 8 उपनगरीय रुग्णालये, 47 दवाखाने आणि 10 प्रसूतिगृहांमध्ये ही सेवा मिळेल.

पश्चिम उपनगरांत थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी 29.14 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये 8 उपनगरीय रुग्णालये, 58 दवाखाने आणि 13 प्रसूतिगृहांमध्ये ही सुविधा मिळेल.

शहर विभागासाठी थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी 23.18 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये 5 विशेष रुग्णालये, 70 दवाखाने आणि 10 प्रसूतिगृहांमध्ये ही सुविधा मिळेल.