ठाणे : देशात सध्या कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. अशातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हेच शस्त्र असल्याचं वैज्ञानिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम जलद करण्याचा प्रयत्न वारंवार प्रशासनाकडून केला जात आहे.
लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात तृतीयपंथीसाठीचं राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र काल (शनिवारी) ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात पार पडलं. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची उपस्थिती होती. शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. आज एकूण शहरातील 16 तृतीयपंथीना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात काल (शनिवारी) कोरोनाचे 204 नवे रूग्ण सापडले असून काल दिवसभरात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 10 हजार 489 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात काल 58 नवे रूग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत 1 हजार 964 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू
राज्यात काल 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,373 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,10,356 इतकी झाली आहे. काल 257 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,32,597 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,63,420 (15.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,06,506 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,695 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.