ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. सेल्फी काढण्याच्या नादात हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील गोदरेज कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी वासिंदमध्ये राहणाऱ्या गौरव चन्ने या मित्राकडे आले होते. बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भातसा नदीकिनारी सात ते आठ जण फिरायला आले. यापैकी दोन तरुण पाण्यात पडून नदीच्या प्रवाहात बुडाले.
अंधेरीत राहणारे 21 वर्षीय अल्ताफ हुसेनअली अन्सारी आणि 20 वर्षीय फरिद मयुद्दिन सय्यद हे दोघं बुडाले. त्यापैकी अल्ताफचा मृतदेह सापडला असून फरिद अद्यापही बेपत्ता आहे. सेल्फी काढण्याच्या नादात तरुण पाण्यात पडल्याचं बोललं जात आहे.
वासिंद पूर्वेकडील शास्त्री कॉलनीत गणपती मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या पंपहाऊसशेजारी ही घटना घडली. कल्याण अग्निशमन दलाच्या 12 जवानांनी शोध मोहिम सुरु केली आहे. वासिंद पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.