मुंबई : सचिन वाझेला आणखीन दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. आपल्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्याची वाझेनं केलेली मागणी विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावली आहे. बायपास सर्जरी झाल्यामुळे तीन महिने घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी करणारा वाझेचा अर्ज एनआयएच्या विरोधानंतर कोर्टानं फेटाळून लावला. तसेच वाझेला वॉकहार्ट हॉस्पिटलतून आता जेलच्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची परवानगीही कोर्टानं दिली आहे. गरज लागलीच तर वाझेला जेजेतील जेल वॉर्डात दाखल करण्याची मुभा जेल प्रशासनाला देण्यात आली असून तूर्तास वाझेला घरचं जेवण देण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे.


मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेनं सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नव्यानं अर्ज दाखल केला आहे. ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेण्यात यावं, अशी मागणी वाझेनं या अर्जातून कोर्टाकडे केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एआयए)ला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याला विरोध करताना घरच्या नजरकैदेतून वाझे पळून जाण्याची शक्यता आहे अशी भीती व्यक्त करत जेलच्या रूग्णालयात सचिन वाझेची योग्य ती काळजी घेण्यात येईल अशी हमीही राज्य सरकारकडनं कोर्टाला देण्यात आली.


अँटालियाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे माजी सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरीक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेला हार्टचा त्रास असल्यानं 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्यानं मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रुणालयात वाझेवर 14 सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली होती.