शिवसेना-भाजपची दोस्ती, ठाणे पालिका आयुक्त तोंडघशी
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2018 12:08 PM (IST)
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांनी उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेतल्याचं शिवेसेनेनं मुख्यमंत्र्यांना कळवलं.
(फाईल फोटो)
मुंबई : ठाण्यातील विकासकामांच्या उद्घाटनावरुन रंगलेल्या महानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारा सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर आहेत. ठाण्यातील विविध 25 प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रंगणार होता. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांनी उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेतल्याचं शिवेसेनेनं मुख्यमंत्र्यांना कळवलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही उद्घाटनाला येण्यास नकार दिला. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.