ठाणे : महसूल खात्याचे बनावट सरकारी स्टॅम्प बनवून, पावती बुक छापून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी टोळीतील सदस्यांकडून एक कोटी 28 लाख रुपयांची 156 बनावट पावती पुस्तकं, तसंच लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी तीन ते चार महिन्यांपासून हे काम करत होती. परिणामी सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला होता. या टोळीतील एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.


ही टोळी कळवा परिसराच्या आजूबाजूला कार्यरत होती. टोळीतील एक सदस्य 11 जुलै रोजी कळवा रेती वाहतूक परवान्याची बनावट पावती पुस्तक घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ठाण्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांना घेऊन ठाणे पोलिसांनी संबंधित जागेवर सापळा रचला. यात विकी विभीषण माळी (वय 25 वर्ष) याला ताब्यात घेतलं. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून रेती वाहतूक परवान्याची बनावट पावती पुस्तकं सापडली.

यानंतर तहसीलदार मुकेश पाटील यांनी विकीविरुद्ध कळवा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली असता टोळीतील आणखी नऊ नावं समोर आली. यानंतर कारवाई करत पोलिसांनी या नऊ जणांना अटक केली. अब्दुल समद बहाउद्दीन खान (वय 35 वर्ष), पद्माकर दत्ताराम राणे (वय 29 वर्ष), शाजी वल्लीथ पुन्नन (वय 45 वर्ष), अरविंद सूर्यकांत पेवेकर (वय 30 वर्ष), प्रशांत रघुनाथ म्हात्रे (वय 33 वर्ष), धनसुख उर्फ लकी ईश्वरभाई सुतार (वय 31 वर्ष), उमेश गजोधर यादव (वय 34 वर्ष), राजू माधव पवार (वय 30 वर्ष), रवी वेदप्रकाश जैस्वाल (वय 40 वर्ष) अशी अटक झालेल्यांची नावं आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींची नाव निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचं पोलिस उपायुक्त दीपक देवराज म्हणाले.