ठाणे : मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान लवकरच नवीन स्टेशन होणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात माहिती दिली असून कोपरी ब्रिजचं कामही लवकरच सुरु होणार आहे.


ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या आणि अनेक वर्ष चर्चेच्या फेऱ्यात अडकलेल्या विस्तारित ठाणे स्थानकाला मंजुरी मिळाली आहे. मध्य रेल्वे 15 दिवसात कोपरी ब्रिजबाबत अभ्यास करुन, डिझाइन तयार करुन टेंडर काढणार आहे. एमएमआरडीए, बीएमसी आणि टीएमसी मिळून बाकी कामं करणार आहेत.

नवीन स्टेशन, नवीन कोपरी ब्रिज आणि ठाणे पूर्वमधील सॅटिस 2 प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जानेवारीपर्यंत सर्व प्रकल्प सुरु होणार आहेत.

दीडशे वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला जवळपास साडेसात लाख जण प्रवास करतात. ठाण्याच्या वाढणाऱ्या गर्दीवर उतारा म्हणून विस्तारित स्थानकाच्या रूपाने नवं स्थानक मिळणार आहे.

विस्तारित रेल्वे स्थानक आणि इतर प्रकल्पांसाठी मनोरुग्णालयाची 14 एकर जागा वापरण्यात येणार आहे. त्या बदल्यात रुग्णालयाला महापालिका टीडीआर किंवा एलिजिबल बिल्डेबल एफएसआय देण्यास तयार असल्याचं संजीव जयस्वाल यांनी सांगितलं.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा, डीआरएम एस के जैन, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, खासदार राजन विचारे, एमएमआरडीएचे अधिकारी, एमआरव्हिसिचे अधिकारी, बीएमसी अधिकारी यांची बैठक झाली.

रेल्वे आणि आरोग्य विभागकड़ून आवश्यक तो सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नवीन स्टेशन ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणार असून सर्व बाबी चर्चेत आल्या आहेत.