मुंबई : तब्बल सव्वापाच वर्ष सेवा बजावल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे डॅशिंग आणि तितकेच वादग्रस्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर ठाण्याला अलविदा केला आहे. बुधवारी (4 मार्च) ठाणे महापालिकेत प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना 'आज मी, माजी आयुक्त संजीव जयस्वाल म्हणून सर्वाना सामोरे जात असल्याचे स्पष्ट केले. सोबत राज्य सरकारने मला सुट्टी नाकारली, तसेच माझी बदली देखील केली नाही, मला ठाण्यात आता काम करायचे नाही असे म्हणत मी देवदर्शनाला निघालो' असे ते म्हणाले. ठाण्यातील आपल्या आठवणींवर ते पुस्तक देखील लिहिणार आहेत.


ठाणे महापालिकेत आयुक्तपदी 12 जानेवारी 2015 रोजी रुजू झालेल्या संजीव जयस्वाल यांनी ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक कार्यकाळ बजावला. तब्बल सव्वापाच वर्षे आयुक्तपदी राहिलेल्या जयस्वाल यांनी पालिकेच्या महसूल वाढीसह रस्ता रुंदीकरण आणि 200 विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले. मात्र हे करत असतानाच अनेक वादात देखील ते अडकले. नगरसेवकांना धमकावणे, त्यांच्यावर सर्रास कारवाई करणे, त्यांचा निधी रोखणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. तर रिक्षाचालकांना स्वतः रस्त्यावर उतरून मारणे, आरटीआय कार्यकर्त्यांना खंडणीखोर म्हणणे आणि नुकतेच बाहेर आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना व्हाट्सएपच्या ग्रुपवर शिव्या देण्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे आयुक्तांची एग्झिट देखील वादग्रस्त ठरली. आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी राज्य सरकारकडे बदली किंवा सुट्टी मागितली होती. मात्र राज्य सरकारने नवीन बदली नंतर सुट्टी घेण्याचे सांगून सुट्टी नाकारली. तसेच येथेच मुदतवाढ देण्याचे सांगताच जयस्वाल यांनी आज स्वतःहून कारभार अतिरिक्त आयुक्तांकडे सोपवला आणि ते निघून गेले. त्यामुळे असे कोणते कारण आहे ज्यामुळे आयुक्त ठाण्याचा कारभार करायला तयार होत नाहीत? राज्य सरकारने बदली केली नसताना आणि सुट्टी नाकारली असताना आयुक्त सुट्टीवर जाऊ शकतात का? असा प्रश्न येथे निर्माण होत आहेत.
अनौपचारिक गप्पा मारताना आयुक्तांनी मांडलेले मुद्दे

प्रसारमाध्यमांसह तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान मंत्री व लोकप्रतिनिधीचेही उत्तम सहकार्य लाभले. तेव्हा,आपल्या कामाचे रिपोर्ट कार्ड देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची टीम ठाणे बनवून एकमेकांच्या अडीअडचणीत धावून गेलो. काही बाबींमध्ये भांडणेही झाल्याची कबुली आयुक्तांनी दिली. अनधिकृत बांधकामे तसेच,बार-लॉजसारख्या प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हातोडा चालविल्याने प्रसंगी संपूर्ण कुटुंबाला बदनामीकारक मोहिमेलाही तोंड द्यावे लागले. मात्र,ठाणेकरांचे प्रेम हीच खरी शक्ती होती. जेणेकरून शहराच्या विकासासाठी झटण्याची प्रेरणा मिळाली. या सर्व कटू-गोड आठवणीबाबत भविष्यात बायोग्राफी स्वरूपात पुस्तक लिहिणार असल्याचा मनोदय जयस्वाल यांनी व्यक्त करून जड अंतःकरणाने ठाण्याचा निरोप घेतला.

VIDEO | माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणा, ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचं महापौरांना पत्र | एबीपी माझा