मुंबई : सव्वाशे वर्षे जुन्या असलेल्या धोबीघाटावरची अतिक्रमणे मुंबई महापालिकेनं हटवली, मात्र पालिकेच्या या कारवाईविरोधात शिवसेनेच्याच नेत्यांनी जी साऊथ वॉर्डमध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध महापालिका असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.


महापालिकेने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली होती. यावेळी धोबीघाटावरील पायवाटांवरची अतिक्रमणं काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे पाच ठिकाणी उभारण्यात आलेले अनधिकृत शेडही तोडण्यात आले होते.

वर्षानुवर्षे धोबीघाटावर काम करणाऱ्या व्यक्तींचे जुने पुरावे ग्राह्य धरले गेले नाहीत, असं स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचं म्हणणं आहे. आमदार सुनिल शिंदे, नगरसेवक आशिष चेंबुरकर, किशोरी पेडणेकर या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जे बांधकाम अनधिकृत आहे, ते आम्ही पाडत आहोत. आतापर्यंत 67 बांधकामं तोडली असून दोन दिवस कारवाई बंद आहे. पालिका आयुक्तांसोबत बैठक झाल्यावर निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आलं आहे.

या धोबी बांधवांना फक्त कपडे धुण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. पण या भागात अनेक अनधिकृत बांधकामं आहेत. शेगड्या, भट्ट्या इथे पेटवल्या जातात. कमला मिलसारखी दुर्घटना होऊ नये, म्हणून ही कारवाई करत असल्याचं जी साऊथ भागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांनी सांगितलं.