नऊ थर, 40 फूट, 11 लाखांचं बक्षीस, ठाण्यात मनसेची कायदाभंग हंडी
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2016 04:38 AM (IST)
ठाणे : सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाला न जुमानता मनसेने ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल 40 फुटांवर दहीहंडी बांधली आहे. 'कायदाभंग' असं या हंडीला नाव देण्यात आलं आहे. नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. आज दहीहंडीची व्हिडिओग्राफी होणार असून पोलिस उद्या कारवाई करायची की नाही यासंदर्भात निर्णय घेतील. सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्यावर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतरही डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालं आहे. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने पाच थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर सलामी दिली. या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक कुमार आवटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्याला आदर असला तरीही आमचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ नये असं या मंडळाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे नवसाई पथकातले गोविंदा आज सात थर लावणार आहेत, असंही आवटे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंदा पथकावर कोणती कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.