मुंबई : मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील पुलाच्या खालील भागाचे सिमेंटचे प्लास्टर पडले. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी अभियंत्यांची एक टीम मध्यरात्री त्या ठिकाणी पाठवून पुलाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्लास्टर पडलेल्या जागी तात्पुरते प्लास्टर लावले आहे.


कोपरी पुलाखालून सतत रेल्वेच्या फेऱ्या सुरु असतात, सुदैवाने प्लास्टर पडले त्यावेळी खालून रेल्वे जात नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु मध्य रेल्वेच्या अभियंत्यांना याची माहिती मिळाल्यानंतर तिथे तात्पुरती डागडुजी केली आहे. परंतु मध्य रेल्वेने याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही.

आज (गुरुवार, 11 एप्रिल)एबीपी माझाच्या टीमने घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाची अवस्था खूपच वाईट असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी या पुलाचे सिमेंटचे प्लास्टर पडले आहे, अनेक ठिकाणी आतल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. सळ्यांना गंज चढला असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा पूल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे, परंतु गेल्या दोन वर्षाती पुलांच्या दुर्घटना पाहता, मध्य रेल्वेच्या या माहितीवर विश्वास कसा ठेवावा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एमएमआरडीए या पुलाची पुनर्निर्मिती करणार आहे, परंतु तोवर प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागणार आहे.