भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार कपिल पाटील हे आचारसंहितेचा उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांनी केला आहे. उत्तर भारतीय मतदारांना मोबाईल फोनद्वारे संबोधित करताना मतदान करुन गावाला जा, तुम्हाला तिकिटही काढून दिलं जाईल, असं आमिष कपिल पाटलांची दिल्याचा आरोप पंकज गायकवाड यांनी केला आहे.



पंकज गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कपिल पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. खासदार कपिल पाटील हे कामतघर, ब्रम्हानंदनगर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात फोनद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी 29 एप्रिलच्या आधी गावी जाऊ नका. 29 एप्रिलनंतर गावी जा, सर्वांना मी बिहार, उत्तर प्रदेशचं तिकीट काढून देईल, असं आश्वासन दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.


यासंदर्भातील व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. या सर्व बाबींचा विचार करुन आचारसंहितेचं उल्लघंन केल्याप्रकरणी कपिल पाटील यांचा अर्ज बाद करण्यात यावा, अशी मागणी पंकज गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.



याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून व्हिडीओ आणि सीडीची अवलोकन करुन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.