ठाणे : पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून सर्वत्र पेट्रोलच्या दरवाढीविरोधात संतापाचं वातावरण आहे. राजकीय पक्ष रस्त्यावर उतरुन निषेध, आंदोलनं करत आहेत. मात्र अशात हतबल झालेल्या मुरबाडच्या एका शेतकऱ्यावर दुचाकी विकून चक्क घोडा घेण्याची वेळ आली आहे. पेट्रोल भरणं आता आवाक्यात राहिलं नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया या शेतकऱ्यानं दिली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे भाव मागच्या काही दिवसात रोज वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर सुरु झालेलं इंधन दरवाढीचं सत्र अजूनही सुरु आहे. या दरवाढीविरोधात एकीकडे राजकीय पक्ष आंदोलनं करत असले, मोर्चे काढत असले, तरी सरकार मात्र या सगळ्याची दखल घ्यायला तयार नाही आणि त्यामुळेच सर्वसामान्य अगदी हतबल झाला आहे. यातूनच एका शेतकऱ्यावर त्याची दुचाकी गाडी विकून घोडा घेण्याची वेळ आली आहे.
कॅशलेस व्यवहारांमुळे जगाच्या नकाशावर प्रकाशात आलेलं ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं धसई गाव. या गावात पांडुरंग विशे हे शेतकरी राहतात. पांडुरंग यांच्याकडे तीन म्हशी असून त्यांचं दूध काढून शेजारपाजारच्या गावात विकून त्यांचं घर चालतं. या व्यवसायासाठी त्यांनी मोठ्या हौशीने स्प्लेंडर गाडी घेतली होती. या गाडीवरुन दररोज फिरुन ते दूध वाटायचे, ज्यातून त्यांना दिवसाला 400 ते 450 रुपयांची कामे व्हायची. पण पेट्रोलचे भाव गगनाला भिडू लागले आणि सारं गणितच बिघडलं. 400 रुपयांपैकी जवळपास 100 ते 150 रुपये रोजच्या पेट्रोलला जाऊ लागल्याने कमवायचं किती? त्यातलं म्हशींना काय खाऊ घालायचं? आणि स्वतः काय खायचं? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. आणि अखेर त्यांनी मनावर दगड ठेवून दुचाकी विकण्याचा निर्णय घेतला.
दुचाकी विकली असली, तरी दूध वाटायला पायी फिरणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी घोडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सध्या गावात आणि शेजारपाजारच्या परिसरात दूध वाटण्यासाठी पांडुरंग विषे हे घोड्यावरुन जातात. या घोड्याला त्यांनी घुंगरु ही बसवले आहेत. त्यामुळे घुंगरांचा आवाज आला, की दूध आलं, अशी वर्दी दुरुनच पोहोचते आणि महिला हातात दुधाचं भांडं घेऊन उभ्या राहतात. मंडळी बघायला जरी हा एखाद्या चित्रपटातला किस्सा वाटत असला, तरी यामागे किती हतबलता आहे, याचा हे स्वतः अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
मागच्या काही दिवसात सातत्याने वाढत असलेले पेट्रोलचे भाव आता 85 रुपयांच्या पुढे गेले आहे. हे भाव असेच वाढत राहिले, तर आज जी वेळ पांडुरंग विशेंवर आली आहे, ती उद्या तुमच्या-आमच्यावरही येऊ शकते, हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे मायबाप सरकार आतातरी डोळे उघडून सर्वसामान्यांची ही अवस्था बघते का? हेच पाहावं लागेल.
घोड्यावरुन दूधविक्री, पेट्रोल महागल्याने दुचाकी विकून घोडा घेण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 May 2018 03:39 PM (IST)
दुचाकी विकली असली, तरी दूध वाटायला पायी फिरणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी घोडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -