Thane Borivali Tunnel Project: ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी निधीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन योजनेतून ठाणे ते बोरिवली प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या या दोन ठिकाणांदरम्यान गाडीने पोहोचण्यासाठी दीड ते पाऊण तास लागतो. मात्र बोगदा मार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार करता येईल, असा अंदाज आहे. (Thane)

Continues below advertisement

दोन मोठ्या प्रकल्पांसाठी 300 कोटी रुपयांचा निधी

मुंबईतील पश्चिम उपनगराला थेट ठाणे शहरासोबत जोडण्यासाठी ठाणे - बोरिवली हा दुहेरी बोगदा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आर्थिक मंजुरी देत मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएला मिळाला आहे. यापैकी 210 कोटी रुपये ट्विन टनेलसाठी, तर उर्वरित 90 कोटी रुपये मरीन ड्राइव्ह प्रकल्पासाठी वापरले जाणार आहेत. या निधीमुळे अडकलेले काम गतीमान होणार असून, पुढील टप्प्यांवर जलदगतीने काम होण्याची अपेक्षा आहे.

या मार्गाची एकूण लांबी 11.85 किमी असेल, ज्यातील तब्बल 10.25 किमी अंतर भुयारी बोगद्याद्वारे पार केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा भुयारी मार्ग थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास 18,838 कोटी रुपये इतकी प्रचंड असणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन या प्रकल्पाला नागरी परिवहनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरवण्यात आले आहे.

Continues below advertisement

घोडबंदर रोडवरची वाहतूककोंडी होईल कमी 

सध्या ठाणे आणि बोरिवलीदरम्यान प्रवास करणाऱ्यांना घोडबंदर रोडवरची वाहतूककोंडी आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण मोठ्या प्रमाणावर जाणवतो. हा नवीन दुहेरी बोगदा सुरू झाल्यानंतर या दोन्ही मार्गांवरील दबाव कमी होईल. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर इंधनाचीही बचत होईल. त्याचबरोबर या परिसरातील विकासालाही चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या भुयारी मार्गात दोन मुख्य मार्गिका असतील, तर आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र तिसरी मार्गिका ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीची सुरक्षितता आणि आपत्कालीन स्थितीत तातडीची मदत यांची हमी मिळेल. प्रवास पूर्णपणे सिग्नलमुक्त व विनाथांबा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

टनेलमुळे ठाणेकर आणि मुंबईकरांना मोठा दिलासा

ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पाला गेल्या अनेक वर्षांपासून ‘महत्त्वाकांक्षी’ ओळख लाभली आहे. मात्र, निधीअभावी तो विलंबित होत होता. आता राज्य सरकारकडून निधीची पहिली मंजुरी मिळाल्यामुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. या टनेलमुळे ठाणेकर आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

-ठाणे-बोरिवली प्रवास 12 मिनिटांत
-18,838 कोटींचा अंदाजित खर्च
-11.85 किमी मार्ग, त्यातील 10.25 किमी बोगद्याचा मार्ग

या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर हा दुहेरी बोगदा केवळ प्रवास सुलभ करणारा नाही, तर मुंबई-ठाणेच्या वाहतुकीच्या चित्रात ऐतिहासिक बदल घडवणारा ठरणार आहे.