ठाणे : वाढत्या उष्णतेमुळे दिवसा प्रवास करताना अनेक प्रवाशांना ऊन आणि त्यामुळे येणाऱ्या घामाचा त्रास सहन करावा लागतो. मात्र गारेगार हवा फक्त ओला-उबर सारख्या महागड्या टॅक्सीमध्येच मिळते, असं नाही. ठाण्यातील रिक्षाचालक तितक्याच पैशात एसी रिक्षाचा अनुभव देतो.
ठाण्यातल्या एका रिक्षावाल्यानं खास उन्हाळ्यासाठी एसी रिक्षा आणली आहे. विजेचा अजिबात वापर न करता रिक्षाचालक इसाक शेख नासिर यांनी आपल्या घरीच हा एसी तयार केला. कल्पकतेतून तयार केलेल्या त्यांच्या रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या एसीनं चांगलाच थंडावा मिळतो.
विशेष म्हणजे या 'एसी'सेवेसाठी प्रवाशांकडून ते कोणताही अतिरिक्त शुल्क आकारत नाहीत. नासिर यापूर्वी कूलिंग टॉवरसाठी काम करायचे. प्रवाशांना गारवा मिळावा यासाठी त्यांनी अचाट कल्पना शोधून काढली. हे यंत्र तयार करण्यासाठी फक्त एक हजार रुपये खर्च आल्याचं ते सांगतात.
नासिर भिवंडीचे रहिवासी असून ठाण्यात रिक्षा चालवतात. त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळ्याच्या दिवसात एसी रिक्षाचा अनुभव घेण्याची संधी मिळू शकते.