मुंबई : राज्यभरात आज मनसेचं भोंग्यांविरुद्ध आंदोलन सुरु आहे. ज्या मशिदींवर भोग्यांवर अजान वाजेल तिथे हनुमान चालीसा लावली जात आहे. परंतु पोलिसांनी खबरदारी घेत मनसे अधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. "पोलीस मनसैनिकांना नोटीस पाठवत आहेत. माझ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं जातंय, हे आमच्या बाबतीच का घडतंय? कायदा न पाळणाऱ्यांना मोकळीक दिली जातेय," असा आरोप त्यांनी केला. सोबतच भोंग्यांचा विषय फक्त एका दिवसाचा नाही, भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पाहूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे
1. मनसैनिकांना नोटीस पाठवत आहेत. माझ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं जातंय, हे आमच्या बाबतीच का घडतंय? कायदा न पाळणाऱ्यांना मोकळीक दिली जातेय
2. आज 90-92 टक्के ठिकाणी भोंग्यांविना सकाळची अजान. मशिदीमधील मौलवींचं मी आभार मानेन, आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला.
3. मुंबईतील 1140 पैकी 1005 मशिदींवरचे भोंगे वाजले नाहीत, तर 135 मशिदींवर पहाटे पाच आधी भोंग्यांवरुन अजान, त्यांच्यावर कारवाई करणार का?
4. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा.
5. मुंबईतील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत, त्या अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी काय देता?
6. मशिदींना वर्षभरासाठी भोंग्यांची परवानगी कशी मिळते. आम्हाला परवानगी देताना दिवसाची देता, सणासुदीची 10-12 दिवसाची परवानगी देता. मग यांना 365 दिवस कशी?
7. हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.
8. आमचं आंदोलन एक दिवसापुरतं नाही, जोपर्यंत भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल.
9. मोबाईलच्या काळात माणसं पकडून काय होणार आहे? अजून 60-70 च्या दशकात आहात का? राज ठाकरेंचं भाषण सुरु झाल्यावर वीज बंद करुन भाषण थांबणार आहे का?
10. ज्या ज्या मशिदीतील मौलवी ऐकणार नाहीत, जिकडे लाऊडस्पीकर लावतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा