मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस. आजच्या वाढदिवसानिमित्त तेजस ठाकरे यांच्या राजकारणात एन्ट्रीच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या जाहिरातीमुळे तेजस यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. नार्वेकर यांनी सामनात दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. सध्या युवासेनेच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरु असून तेजस ठाकरेंना हे पद दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे.  


Tejas Thackeray | तेजस ठाकरेंना वडिलांकडून वाढदिवसानिमित्त 'हे' खास गिफ्ट


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सक्रीय राजकारणात एन्ट्रीनंतर राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याची चर्चा नेहमीच होते. पण यंदा मात्र ही चर्चा सत्यात उतरण्याची शक्यता आहे. याला कारण ठरलीय शिवसेनेच्या मुखपत्रात आलेली जाहिरात. 


तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एक जाहिरात दिलीय. त्यात ठाकरे कुटुंबियांचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा मजकूर दिला आहे. या शुभेच्छांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या शुभेच्छामध्ये तेजसला थेट व्हिव्हियन रिचर्ड्सची उपमा दिली आहे. 



काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या भाषणात जाहिररित्या सांगितलं होतं की “उद्धवचा दोन नंबर मुलगा सेम माझ्यासारखा आहे, त्याच्या आवडीनिवडी माझ्याशी जुळतात” तेव्हापासून तेजस राजकारणात कधी येणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.


उद्धव आणि आदित्य ठाकरे हे दोघेही शांत आणि संयमी राजकारण करत आले आहेत. तेजस आक्रमक असल्याची चर्चा नेहमीच होते. त्यामुळे तेजस यांनी राजकारणात यावं ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. तेजस ठाकरे सध्या देशांतल्या विविध जंगलांमध्ये जाऊन संशोधन करत आहेत. निवडणुकांच्या काळात तेजस ठाकरे हे आदित्य आणि उद्धव ठाकरेंसोबत क्वचितच दौरे करताना दिसतात. तेजस ठाकरे अजून राजकारणासाठी तितकेसे सज्ज नाहीत. मात्र आता या चर्चांमुळं आदित्य ठाकरेंनंतर तेजस ठाकरे राजकारणात येण्याची शक्यता आहे.