मुंबई : मागील आठवड्यापासून दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांनी सुरू केले आहे. मात्र, या कामासाठी शिक्षकांना शाळेत जाणे गरजेचे असून लोकल प्रवासाला शिक्षकांना परावनगी नसल्याने रोज शिक्षकांना शाळेत येणे कठीण होत आहेत. यामध्ये तातडीने शिक्षकांना लोकल प्रवासासाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी शिक्षक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या मागणीबाबत आश्वासन देऊन सुद्धा याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने दहावी निकाल प्रक्रियेवर आजपासून बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.


लोकलमध्ये प्रवासाला परवानगी नसताना वसई, विरार, पालघर, पनवेल, ठाणे कल्याण या भागातून रोज मुंबईत शाळेत येणारे शिक्षक कसा प्रवास करणार? असा प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे. त्यामुळे लोकलचे तिकीट मिळत नसेल तर शाळेत जाऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वेळेत होऊ शकणार नाही. त्यामुळे दहावीचा निकाल वेळेवर तयार, झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असं शिक्षक शिक्षक भारतीकडून सांगण्यात आले आहे.


राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे, असे आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. तसेच दहावीच्या निकालाचे काम करण्यासाठी दहावीला शिकवणारे शिक्षक आणि वर्गशिक्षक यांची उपस्थिती तर शाळांत अनिवार्य राहणारच आहे. 


अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी सध्या देता येणार नाही असे स्पष्ट केले. जोपर्यंत मुंबई लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये जात नाही तोवर शिक्षक, शिक्षकेतरांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र या दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागावा यासाठी  शिक्षकाना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, दंड भरून लोकल प्रवास करावा लागत आहे. 


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने सुद्धा दोन दिवसांपूर्वी कायदेभंग आंदोलन करत दंड भरून शिक्षकांनी प्रवास केला. तरीसुद्धा, कुठलाही निर्णय शिक्षकांच्या लोकलप्रवास बाबत झाला नाही. त्यामुळे निर्णय गुरुवरपर्यत न झाल्यास आम्ही सुद्धा या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार टाकू व तीव्र आंदोलन करू, असं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी इशारा दिला आहे.