अंबरनाथ मधील फातिमा इग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 17 जानेवारीला शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीने त्यावेळी आपण पाय घसरुन पडल्याचं सांगितलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी समुपदेश केल्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल कशामुळे उचललं, ते समोर आलं.
पीडित मुलीची दुसऱ्या वर्गातील एका मुलाबरोबर मैत्री होती. त्यावरुन 16 जानेवारीला दोन महिला शिक्षकांनी या मुलीला भरवर्गात सर्वांसमोर टोमणे मारले. तर दुसऱ्या एका शिक्षकाने या मुलीवर प्रेमसंबंधांचा आरोप केला.
''शिक्षक माझ्यावर फक्त प्रेमसंबंधांचेच खोटे आरोप करुन थांबले नाहीत, तर त्यांनी शाळेमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तालीमीत मला घेऊ नये, असे माझ्या नृत्य शिक्षकांना सांगितलं. त्यामुळे मी खूप निराश झाले आणि आत्महत्येचा निर्णय घेतला आणि नैराश्येपोटीच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला,'' असं या मुलीने सांगितलं.
या मुलीच्या वडिलांना एफआयआर नोंदवायचा होता. मात्र पोलिसांनी फक्त अर्ज स्वीकारला. तर या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं अंबरनाथ पोलिसांनी सांगितलं. शिवाय तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही पोलिसांनी दिलं आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे.
''ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी आम्हाला शाळेत बोलावून नंतर सांगितलं की, तुमची मुलगी पाय घसरून पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आम्ही चांगलं शिक्षण मिळावे म्हणून या शाळेत मुलीला प्रवेश घेतला. मात्र आता या शाळेत पुन्हा मुलीला पाठवणार नाही,'' असं पीडित मुलीच्या पालकांनी सांगितलं.