टाटा फायनान्सचे माजी एमडी दिलीप पेंडसेंची कार्यालयातच आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2017 08:46 PM (IST)
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे यांनी कार्यालयातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दादर येथील कार्यालयात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. दिलीप पेंडसे पत्नीसोबत दादर पूर्वेकडील रॉयल ग्रेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचं कार्यालय आहे. सकाळी 9 वाजता ते कार्यालयात आले. त्यानंतर बराच वेळ ते बाहेर न आल्याने दुपारी अडीच वाजता स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पेंडसेंनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. वैयक्तीक कारणांमुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. दिलीप पेंडसे टाटा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेल्याने टाटा समूहाने 2001 मध्ये त्यांच्यावर कारवाई केली होती. पेंडसेंविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यामुळे पेंडसे यांना तुरूंगाची हवाही खावी लागली होती.