मुंबई : माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहाच्या इतिहासात प्रथमच शरीरसौष्ठवाचा थरार रंगणार आहे. शरीरसौष्ठव खेळाची अभूतपूर्व केझ पाहाता व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांनी 2700 आसनक्षमता असलेल्या भव्य आणि दिव्य षण्मुखानंद सभागृहात यंदाची तळवलकर क्लासिक आयोजित करणार असल्याचे आज जाहीर केले.




तळवलकरांच्या कल्पेनेतून आकारात येत असलेली शरीरसौष्ठवातील सर्वात श्रीमंत अशी तळवलकर क्लासिक स्पर्धा येत्या 27 आणि 28 नोव्हेंबरला मुंबईत पार पडेल.  या स्पर्धेच्या सोबतीला मोजक्या मिश्र दुहेरीतील फिट ऍण्ड फाइन जोड्या आपले तालबद्ध फिटनेस प्रदर्शन सादर करतील.



आज मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत स्पर्धेचे सर्वेसर्वा मधुकर तळवलकर यांनी आपण क्लासिकल स्पर्धा केवळ नावासाठी घेत असून आपल्या स्पर्धेतून शरीरसौष्ठवपटूंना दोन-तीन महिन्यांचा खुराक मिळावा आणि शरीरसौष्ठवाची केझ वाढावी हे दृष्टिकोण असल्याचे सांगितले.

भारतातील पीळदार आणि आंतरराष्ट्रीय ग्लॅमर असलेले 30 दिग्गज शरीरसौष्ठवपटू एकाचवेळी एकाच मंचावर प्रेक्षकांना याची डोळा पाहाता हा सारा खटाटोप असल्याचे तळवलकर म्हणाले. या स्पर्धेसाठी भारतातील फाइव्ह स्टार खेळाडू येणार असल्यामुळे सर्व खेळाडूंना फाइव्ह स्टार सुविधा पुरवणार असल्याचेही तळवलरांनी आवर्जून सांगितले.



यापूर्वी शरीरसौष्ठवाची एकही स्पर्धा या ऐतिहासिक सभागृहात आयोजित झालेली नाही. ती प्रथमच होत असल्यामुळे शरीरसौष्ठव जगतात स्पर्धेविषयी जबरदस्त उत्सुकता दिसून येतेय.

नुकत्याच मंगोलिया येथे झालेल्या मि.वर्ल्ड स्पर्धेत सुवर्ण पटकावणारा महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण, सलग दोनवेळा भारत श्री काबिज करणारा सुनीत जाधव, मि. आशियाचा तीनवेळा मानकरी ठरलेला बॉबी सिंग,गतविजेता राम निवास, सागर जाधव, जगदीश लाड, अक्षय मोगरकर,रोहित शेट्टीसारखे बाहुबली आपल्या पीळदार स्नायूंनी मुंबईकरांना भुरळ घालणार असल्याचे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले.



भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद असलेले रेल्वे आणि महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. त्याखेरीज ओडिशा, दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेशचे स्टार तळवलकर क्लासिकच्या टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.



तळवलकर क्लासिक ही आजवरची सर्वात श्रीमंत स्पर्धा ठरणार आहे. 20 लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत विजेता 6 लाखांचा मानकरी ठरेल. टॉप टेनवर बक्षीसांचा पाऊस पाडला जाणार असून उपविजेता 3 लाखांचा तर दहावा क्रमांक 50 हजारांचा धनी होईल. मिश्र जोडींच्या या स्पर्धेत विजेती जोडीही लखपती होईल अशी माहिती आयोजकांनी दिली.