मुंबई : दिल्ली ते मुंबई दरम्यान होत असणाऱ्या टॅल्गो ट्रेनच्या चाचणीत पावसाचा अडसर निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे टॅल्गो ट्रेन मुंबईत उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे.
गुजरातमधल्या पावसामुळे वापीमधील दमणगंगा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे टॅल्गोसह उत्तरेहून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे.
दिल्ली ते मुंबई या दरम्यान आज टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी होणार आहे. टॅल्गो ट्रेन काल संध्याकाळी आठच्या सुमारास दिल्लीवरुन सुटली. ही ट्रेन मुंबईत सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं.
130 किलोमीटर प्रतितास या वेगाने टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी होत आहे. यानंतरची दुसरी चाचणी 11 ऑगस्ट आणि तिसरी चाचणी 12 ऑगस्टला होणार आहे. तिसऱ्या चाचणीत ट्रेनचा वेग 150 किमी प्रतितास असेल.
साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे.