मुंबई: छगन भुजबळांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असे आरोप काल (मंगळवार) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते. त्यांच्या याच आरोपांवर आक्षेप घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची करणार असल्याचा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे.


छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात दारु, चिकन बरोबरच शाही बडदास्त ठेवली जाते. असा आरोप काल अंजली दमानिया यांनी केला होता. त्यासंदर्भात आज महाराष्ट्र कारागृह विभागाकडून चौकशीचेही आदेश दिले आहेत. मात्र, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यात काडी एवढंही तथ्य नाही. असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यासंदर्भात एक पत्र लिहून त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

‘दमानियांचे आरोप खोटे’, छगन भुजबळ यांचं तुरुंगातून पत्र:

14 महिन्यांहून अधिक काळ आम्ही तुरुंगात आहोत. पण आम्हाला जामीन मिळू नये, रुग्णालयात ट्रीटमेंट मिळू नये यासाठी ठराविक काळाने आमच्याविरोधात तद्दन खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अंजली दमानिया यांनी हे सगळे करण्याचे कंत्राटच घेतले आहे.

प्रत्येक सर्कलमध्ये एक सामुदायिक टीव्ही तुरुंगात लावला आहे. ज्यात फक्त दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहता येतात. घरचे जेवण देण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, दर दोन तासांनी फळे दिली जातात हे सुद्धा खोटे आहे. नारळातून वोडका दिली जाते म्हणे, पण तुरुंगात कुणीही बंदी नारळ आणू शकत नाही.

आमच्या रुममध्ये, रुमच्या बाहेर, पॅसेजमध्ये शेकडो सीसीटीव्ही लावले आहेत, आणि जेलबाहेर ते सतत मॉनिटर केले जातात. जेलमध्ये मोबाईल फोन वापरला जातो हा तद्दन खोटा आरोप आहे. बरॅकमध्ये जॅमर लावले आहेत.

सीसीटीव्ही पाहून हे सगळे आरोप किती हिणकस, खोटारडे आहेत हे कोणालाही पाहता येईल. याबाबत वकिलाचा सल्ला घेऊन अंजली दमानियांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत.

- छगन भुजबळ



भुजबळ साहेब मला तडकवू नका: दमानिया

दरम्यान, भुजबळांच्या या पत्रानंतर अंजली दमानिया यांनी एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘अशा कारवाईंची मला सवय झाली आहे. त्यामुळे मला जेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे आहेत.’ असं दमानिया म्हणाल्या.

याचवेळी बोलताना दमानिया यांनी भुजबळांवर गंभीर आरोपही केले. ‘भुजबळ साहेब मला तडकवू नका, तुम्ही एका बाईला पैसे घेऊन माझ्या घरी  पाठवलं होतं. पण अशा पैशांना मी हातही लावत नाही.’

अंजली दमानियांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र कारागृह विभागाकडून चौकशीचे आदेश:

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या तक्रारीनंतर आता महाराष्ट्र कारागृह विभागाकडून यासंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

भुजबळांविरोधात अंजली दमानिया यांचे नेमके आरोप काय?

‘छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आर्थर रोड कारागृहात टिव्हीवर हिंदी चित्रपट पाहतात. त्यांना चिकन मसाला यासारखे पदार्थ पुरवले जातात. एवढंच नव्हे, तर समीर भुजबळांना वोडका ही दारू देखील नारळपाण्यातून दिली जाते.’ असा आरोप अंजली दमानियांनी केला आहे.

अतिरिक्त कारागृह संचालक भुषणकुमार उपाध्याय यांना लिहिलेल्या पत्रात अंजली दमानियांनी हे खळबळजनक आरोप केले आहेत.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी याबाबत एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘जेलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी मला याबाबत माहिती दिल्यानंतर मी याप्रकरणी कारागृह अधीक्षकांना पत्र लिहलं. जवळजवळ जानेवारीपासून हा सर्व प्रकार सुरु आहे.’

याशिवाय भुजबळांना कोर्टात हजर करताना नियम धाब्यावर बसवून अनेक लोक त्यांना भेटतात असा आरोपही दमानियांनी केला आहे. त्याशिवाय जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्या भूमिकेवरही दमानियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या:

‘भुजबळांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट’, दमानियांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश

भुजबळांसाठी जेलमध्ये टीव्ही, चिकन मसाला आणि वोडकाची सोय: दमानिया