मुंबई: बिल्डरवर कारवाई करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधासभेत वेलमध्ये ठिय्या आंदोलन केलं. एलआयसीची फसवणूक करुन बिल्डरने 200 कोटी रुपये लाटल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.


सांताक्रूझ इथल्या खोतवाडी, भिमवाडा एसआरए योजनेतील जमीन बिल्डरने एलआयसीकडे तारण ठेवून 200 कोटी रुपयांचे कर्ज उचललं. मात्र बिल्डर हे पैसे परत करु शकला नाही. आता पैसे वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या मालकीचा भूखंड विक्री करायला काढला आहे. झोपडपट्टीवासियांच्या जीवावर बिल्डर कर्ज घेतात आणि त्या सातबाऱ्यावर बँकेचं नाव लागतं. सरकार उत्तर देतं की त्यांनी केलेल्या व्यवहाराला आम्ही बांधिल नाही. मुंबईत अनेक एसआरए योजनेच्या जमिनी तारण ठेवून अशाप्रकारे बिल्डरांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये उचलले आहेत, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

या प्रकरणाची स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन अधिकाऱ्याकडे चौकशी द्यावी, ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

प्रकाश मेहतांचं आश्वासन

दरम्यान गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विशेष अधिकारी नियुक्त करून १५ दिवसात चौकशी सुरु करण्याचं आश्वासन दिलं.

१५ दिवसात ही झोपडपट्टी योजना मार्गी लावली जाईल. एलआयसीची फसवणूक केली असेल तर  स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन अधिकाऱ्याकडे चौकशी देऊ, असं मेहता म्हणाले.