मुंबई : ताडदेव आरटीओ ऑफिसला लागलेल्या आगीत जळून खाक झालेल्या लर्निंग लायसन्सचा डेटा सर्व्हरवर सुरक्षित असल्याची माहिती राज्य सरकारनं सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. रविवारी लागलेल्या आगीत ताडदेव आरटीओची अनेक कागदपत्रं जळून खाक झाली आहे.
या आगीत लर्निंग लायसन्स तर जळालीच पण त्यासोबतच आग विझवण्यासाठी वापरलेल्या पाण्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड्स भिजल्यानं त्यांचंही नुकसान झालं.
अवजड वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रांच्या संदर्भात पुण्याचे रहिवासी श्रीकांत कर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारनं हायकोर्टाली ही माहिती दिली. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान फिटनेस प्रमाणपत्रांच्या मुद्यावर हायकोर्टाने पुन्हा एकदा राज्य सरकारची कानउघाडणी केली. आरटीओची कार्यालये ही वाहनांच्या फिटनेस चाचणीची केंद्र आहेत का? असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला. तसेच या महत्त्वाच्या मुद्यावर वारंवार निर्देश देऊनही राज्य सरकार त्यानुसार काम करत नसल्यांचही हायकोर्टाने म्हटलं आहे.