मुंबई: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे चुकीची माहिती देत आहेत, दिशाभूल करत आहेत अशा थेट आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. नीलम गोऱ्हे या पुण्याच्या असूनही त्यांना ललित पाटीलची माहिती मिळू शकत नाही का असाही सवाल त्यांनी विचारला. 


काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 


ललित पाटील प्रकरणाकडे सरकारने पक्षीय राजकारण सोडून गांभीर्यानं पाहावं. दोन दिवसांपूर्वी तारांकित प्रश्न अधिवेशनात विचारला होता. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली, ते दिशाभूल करत आहेत. नेक्सेस बाबतीत ते बोलले. सगळं गोलमटोल केला. मुळात त्यांनी दोन एपिसोड करायला हवेत. ललित पाटील नाशिकमध्ये कोणाच्या आशीर्वादाने हे रॅकेट चालवत होता, हे समोर आणायला हवं. ते म्हणाले ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होता. हे धादांत खोटं बोलत आहेत. कारण ललित पाटील ज्या फोटोत दिसतात त्यात दादा भुसे दिसतात, म्हणजे दादा भुसेंनी त्यांना तिथं आणलं होतं हे दिसतं. यावरून देवेंद्र फडणवीस अतिशय शांतपणे खोटं बोलत आहेत.


उपसभापती नीलम गोरे यांनी त्या खुर्चीचा आदर ठेवावा आणि योग्य ती माहिती घेणं आणि देणं गरजेचं आहे. मुळात नीलम गोरे या पुण्याच्या आहेत, मग त्यांना ससून रुग्णालयाशी संबंधित ललित पाटीलची माहिती मिळू शकत नाही का? ललित पाटील प्रकरणी डॉक्टर संजय मरसाळे यांचा आज जामीन झाला आहे. ज्या मरसाळे यांची नोर्को टेस्टची मागणी केली जाते, त्यावेळी त्यांना जामीन कसा काय मिळतो? याचा अर्थ जाणीवपूर्वक हे प्रकरण कमकुवत केलं जातंय का?


देवेंद्र फडणवीस गेल्या अधिवेशनात अनिल जयसिंगानीया यांच्या बाबत ही गोलमटोल बोलले होते. तसंच ललित पाटील प्रकरणात घडतंय. फडणवीस याप्रकरणी ही धादांत खोटं बोलत आहे. ससूनच्या संजीव ठाकूरवर कारवाई केली अशी माहिती फडणवीस यांनी दिली, ही माहिती ही चुकीची आहे. कारण संजीव ठाकूर हे मॅट प्रकरणामुळं बाजूला गेलेत, या सरकारने कारवाई केल्यामुळं त्यांना खुर्ची सोडायला लागलेली नाही.


नीलम गोरे याही पक्षपातीपणा करतात


देवेंद्र भाऊ आम्ही एक व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यात कारागृहाच्या बाजूला दोन पोलीस काहीतरी पुरवत होते. आधी हा व्हिडीओ पुण्यातील नाही, असं बोलण्यात आलं. नंतर नाथा काळे आणि सुरेश जाधव हे दोघे कैद्यांच्या गाडीसोबत होते, हे पुढं या व्हिडीओमुळं स्पष्ट झालं. हेच दोघे ललित पाटील प्रकरणात निलंबन झालं. मग हे दोघे कारागृहालगत काय करत होते, कसली पाकीट ते पुरवत होते. हा खरा प्रश्न आहे? याचं उत्तर देवेंद्रजी यांनी द्यावं.


देवेंद्रजी तुमची ब्रिगेड अभ्यास करत नाही. आता नितेश राणे यांनी आज एक फोटो अधिवेशनात दाखवला. जो दाऊद सोबतचा आहे. मुळात हा फोटो आणि व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या फोटो मध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर आणि आमदार बाळासाहेब सानप हे भाजपचे नेते होते. दोन वर्षांपूर्वी लग्नाला उपस्थित राहिल्यानं अडचणीत आलेले, या प्रकणातून त्यांची नावं वगळली जातात. आता नितेश राणे यावर काय भाष्य करणार? जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.


आता देवेंद्र फडणवीस म्हणाले या प्रकरणात एसआयटी तपास करेल. पण तुम्ही आता कशाकशात एसआयटी स्थापित करणार. मुळात उद्या आदित्य ठाकरे अदानी यांच्याविरोधात मोर्चा काढतायेत, त्या मोर्चाकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी हा खटाटोप सुरु आहे. 


आम्ही डिग्री घेणारे लोक मूर्ख आहोत, कारण आमच्या पीएचडी सारख्या डिग्री वर प्रश्न उपस्थित केले जातायेत. अत्यंत गलथान आणि बालिश विधान केली जातात, मात्र एकाने ही यावर अधिवेशनात भाष्य केलं नाही किंवा दादांनी ही दिलगिरी व्यक्त करण्याची तसदी घेतली नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे