मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांना अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिलाय. हायकोर्टाने शरण येण्याची सूचना देत, कधीपर्यंत शरण येणार याची माहिती आठ जूनपर्यंत द्या, असे आदेश दिले.


शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळ ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या आणि कधीपर्यंत पोलिसांना शरण येणार याची आठ जूनपर्यंत हायकोर्टाला माहिती द्या, असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती साधना जाधव यांनी दिले.

शिरीष कुलकर्णी यांची पत्नी तन्वी कुलकर्णी यांनीही पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहीती मंगळवारच्या सुनावणीत हायकोर्टासमोर ठेवण्यात आली.

अनेक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी.एस.कुलकर्णींसह त्यांच्या परिवारातील अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण, आपल्या परिवारातील अनेकांच्या नावांवार डी.एस.कुलकर्णींनी आपले आर्थिक गैरव्यवहार व्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.