मुंबई : मुख्यमंत्री गेली चार वर्ष एकाच वर्गात अभ्यास करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासाची भारी हौस असल्याचंही त्या म्हणाल्या.

इतिहासामध्ये देशात, राज्यात जितक्या शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत, तितक्या भाजपच्या कार्यकाळात झाल्या आहेत, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला. भाजपने खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना अभ्यासाची हौस आहे. ते गेली चार वर्ष एकाच वर्गात अभ्यास करत आहेत. मुख्यमंत्री चर्चा करायला तयार असल्याचं म्हणाले होते. ते सांगतील तिथे चर्चेला मी तयार आहे. तुम्ही चर्चा करणार का? मी कुणाला घाबरत नाही, असं खुलं आव्हानही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राफेल डीलवरुन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याने नाराज होऊन त्यांनी हे पाऊल उचललं. अन्वर यांनी पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

अन्वर यांनी शरद पवार यांची मुलाखत पाहिली नसावी, किंवा तिचा मुद्दाम विपर्यास केला असावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.