मुंबई : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगातून सुटल्यानंतर अभिनेता संजय दत्तने पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. संजय दत्त रविवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने चक्क भाजपच्या व्यासपीठावर झळकला.

 
गेली अनेक वर्ष संजय दत्तला विरोध करत आलेल्या भाजपच्याच व्यासपीठावर काल भाजप नेते आशिष शेलारांसोबत संजय दत्त उपस्थित होता. यावेळी पालिका निवडणुकीत भाजप नेते मोहित कंभोज यांना विजयी करण्याचं आवाहन संजूबाबाने केलं.

 
विशेष म्हणजे संजय दत्तची बहिण प्रिया दत्त आणि वडील सुनील दत्त काँग्रेस खासदार होते. संपूर्ण परिवार काँग्रेसशी निगडीत असताना संजय दत्तची भाजपच्या व्यासपीठावरील हजेरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे.

 
संजय दत्तची शिक्षा भोगून झाली असल्याने आता तो सामान्य नागरिक आहे. त्याने महाराष्ट्र दिन समारंभात सहभागी होण्याची तयारी दाखवल्यास त्याला विरोध का करायचा, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. यासंदर्भात संजय दत्तला प्रश्न केला असता आपण केवळ मोहित कंभोज यांच्यासाठी आल्याचं तो म्हणाला.