मुंबई : बहुप्रतिक्षेनंतर बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त आज 'सुलतान' या नर वाघाचे अखेर आगमन झाले. राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक त्याला घेऊन नागपूरहून मुंबईला आज सकळी घेऊन आले आहे. मात्र, पर्यटकांना सुलतान वाघाचे दर्शन होणार नाही. कारण, हा वाघ केवळ प्रजोत्पादनाच्या हेतूने आणण्यात येणार असल्याने त्याला व्याघ्र सफारीत प्रदर्शित करण्यात येणार नाही.
बोरिवली नॅशनल पार्कमधील व्याघ्र सफारीत गेल्या कित्येक वर्षांपासून पाळणा हललेला नाही. सध्या या सफारीत चार मादी आणि एक नर वाघ आहे. त्यामधील तीन माद्या या प्रजननाच्या दृष्टीने सक्षम आहेत. मात्र, याठिकाणी असलेल्या नर वाघाकडून प्रजननाचे प्रयत्न असफल झाले. त्यामुळे आता 'सुलतान' या नव्या वाघाला प्रजोत्पादनाच्या अनुषंगाने आणण्यात आले आहे. नागपूर येथील 'गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रा'तून या वाघाची रवानगी मुंबईला करण्यात आली.


दोन गावकऱ्यांना ठार करणारा सुलतान - 
वन विभागाने चंद्रपूर जिल्हातून 12 जुलै, 2018 रोजी 'सुलतान'ला जेरबंद केले होते. त्याने दोन गावकऱ्यांना ठार केल्याने त्याची रवानगी 'गोरेवाडा बचाव केंद्रा'त करण्यात आली होती. तेव्हापासून हा वाघ केंद्रात पिंजराबंद होता. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' प्रशासनाने गोरेवाडा प्रशासनाला वाघ देण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानंतर 'सुलतान'च्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सद्यपरिस्थितीत राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि व्याघ्र-सिंह सफारीचे अधीक्षक विजय बारब्दे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत बचाव पथक 'सुलतान'ची देखभाल करणार आहे.

वाघांचा मानवी वस्तीत वावर -
नैसर्गिक अधिवास संपत चालल्याने अलिकडच्या दिवसांत वन्यजीव प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकवेळा माणसांचा वन्यप्राण्यांशी थेट सामना झाल्याच्या घटांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात असलेल्या टेकडी भागात एका चिमुरडीला बिबट्याने तिच्या आईच्या डोळ्यांदेखत झडप घालून पळवून नेले. दुसऱ्या दिवशी या भागाला लागूनच असलेल्या जंगलात तिचा मृतदेह सापडला होता.

हेही वाचा - वनविभागाचा हलगर्जीपणा, नदीत पडलेल्या 'त्या' वाघाचा अखेर मृत्यू

Sultan Tiger | नागपूरहून सुलतान वाघ बोरिवलीकडे रावाना | ABP Majha