मुंबई : फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचाराचे अभ्यासक, लेखक आणि भाष्यकार सुहास सखाराम सोनावणे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांचा वैचारिक मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ कोसळला.
सुहास सोनावणे यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1939 रोजी भुसावळमध्ये झाला. वाचनाची आवड असल्याने विद्यार्थीदशेपासूनच लेखन आणि वाचनात त्यांचं मन जास्त रमलं. पुढे डॉ. आंबेडकर साहित्याचे संशोधक आणि अभ्यासक म्हणूनही ते नावारुपाला आले.
जुन्या मुंबईवरही सुहास सोनावणे यांनी पुस्तक लिहिलं होतं. तर बाबासाहेब आंबेडकरावर 5 पुस्तके आणि शिवाजी महाराजांवर 4 पुस्तकं त्यांनी लिहिली. मुक्तपत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एबीपी माझाच्या सर्वव्यापी आंबेडकर कार्यक्रमासाठी लेखन आणि संशोधनाचं काम त्यांनी केलं होतं.