मुंबई: जीएसटी विधेयकासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला आज (सोमवार) सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांवरुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दिलीप वळसे पाटलांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ‘जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई झाली आहे.’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी जयंत पाटलांना टोला हाणला.
जयंत पाटलांनी काल कटप्पा आणि बाहुबलीचा संदर्भ देत भाजपवर जोरदार फटकेबाजी केली होती. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवारांनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं. ‘बोर्डीकरांना भाजपमध्ये घेतल्यांचं पाटलांना दु:ख नाही. तर ते संपर्कात असूनही त्यांना पक्षात न घेतल्याचं शल्य आहे.’ असं म्हणत मुनगंटीवारांनी थेट निशाणा साधला.
मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर मात्र, राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे-पाटलांनी आक्षेप घेत. मध्येच हस्तक्षेप केला. ‘तुम्हाला कुणाला घ्यायचं, नाही घ्यायचं... केव्हा घ्यायचं ते घ्या. पण प्रत्येक भाषणात त्याचा उच्चार करुन इतर नेत्यांविषयी शंका निर्माण करु नका.’ असं म्हणत वळसे-पाटील यांनी मुनगंटीवार यांना सुनावलं.