मुंबई : शिवसेना- भाजप युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही. ते दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे. ज्या धोरणात्मक  गोष्टी पटणार नाही त्यावर आम्ही बोलूच, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. वनमंत्रालयाने 1 जुलैरोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

 

मुनगंटीवारांचं हे निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

वाद मिटेल की नाही माहित नाही

 

सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मात्र सध्याचं वातावरण पाहाता, दोन्ही एकमेकांचे प्रचंड विरोधक असल्याचं चित्र आहे.

 

त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

 

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले," ज्या धोरणात्मक  गोष्टी पटणार नाही त्यावर आम्ही बोलूच. शिवसेना- भाजप युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही. ते दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे".

 

राज्यातीलच नव्हे तर देशातील वाघ वाढायला हवे

या भेटीदरम्यान मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना फायबरचा वाघ भेट दिला. यानंतर उद्धव म्हणाले, "राज्यातलेच नाही तर देशातले वाघ वाढले पाहीजे यावर आमचं दोघांचंही एकमत झालं. उद्याच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी सुधीरभाऊ आले होते, येतांना त्यांनी माझ्यासाठी त्यांनी वाघाचा पुतळा भेट आणला. मी भेट आणि निमंत्रणाचाही स्वीकार केला आहे.