मुंबई: शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी आज थेट सरकारची प्रतिकात्मक यात्रा काढली. विरोधकांच्या या कृतीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली. ‘एखाद्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकही असं कृत्य करणार नाही अशाप्रकारचं हीन कृत्य विरोधकांनी आज प्रेतयात्रा काढून केले आहे.’ अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.


नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

‘राज्यात सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्टवादीचा पराभव झाल्यानं त्यांची मनस्थिती ठिक नाही. त्यांना आपला पराभव पचवता आलेला नाही. एखाद्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकही असं कृत्य करणार नाही अशाप्रकारचं हीन कृत्य विरोधकांनी आज प्रेतयात्रा काढून केले आहे.’

‘विरोधकांनी त्यांच्या काळात कमिशन मोडवर राज्य चालवलं. परंतु हे सरकार मिशन मोडवर काम करीत आहे. सरकारच्या या कामाला विरोधक खीळ घालण्याचे काम करीत आहेत. यापूर्वी विरोधकांनी भाजप-शिवसेनेमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न काल पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यांना प्रेतयात्रा काढायाची होती तर, गेल्या १५ वर्षात केलेल्या चुकांची व शेतकर्‍यांवर केलेल्या अन्यायाची प्रेतयात्रा काढायला हवी होती.’

‘अर्थसंकल्प मंजूर करावयाचा नाही अशी विरोधकांची इच्छा होती. अर्थसंकल्प मंजूर करणे हे भामरागड येथील शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी महत्वाचे होते. विरोधकांची संघर्ष यात्रा म्हणजे AC बसमधला प्रवास.’ अशी बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली.



विरोधकांकडून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

विरोधकांनी आज थेट सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्यालय ते विधानभवनापर्यंत ही प्रेतयात्रा काढण्यात आली.

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार सहभागी झाले होते.

विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणारे विरोधक विधानभवनाच्या बाहेर मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे.

यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा. आम्ही परत कर्जमाफी मागणार नाही. आमचे शेतकरी धान्य, फळं, भाजीपाला घेतील, त्याला योग्य बाजारभाव द्या, आधारभूत किंमत द्या, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या: