मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ (Ghatkopar Railway Station) रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याचं समजतं. त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


काम असल्याचं सांगून बाहेर पडले अन्...


रेल्वे रुळावर गुरुवार (31 ऑगस्ट) रात्री सुधीर मोरे यांचा मृतदेह सापडला. रात्री त्यांना एक फोन आला आणि मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असं त्यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं आणि ते घाईत घराबाहेर पडले. त्यांनी बॉडीगार्डला आपल्यासोबत नेलं नव्हतं. गाडी न घेता रिक्षाने गेले. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याणवरुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या (Local Train) मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.


ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केल्याचा निकटवर्तीयांचा दावा


गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती सुधीर मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे.


सुधीर मोरे ठाकरे गटाचे रत्नागिरी संपर्कप्रमुख


सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईट इथले शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. त्यांची वहिनी देखील माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.


हेही वाचा


BARC Scientist Suicide: भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह