मुंबई : सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो देशातील दोन दिग्गज उद्योजक रतन टाटा आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा आहे. टायकॉन मुंबई 2020 (TiEcon Mumbai 2020) कार्यक्रमात रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुरस्कार प्रदान करणाऱ्या नारायण मूर्ती यांनी रतन टाटा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. दोघांच्या वयात केवळ नऊ वर्षांचं अंतर आहे. रतन टाटा 82 वर्षांचे आहेत तर नारायण मूर्ती यांचं वय 73 वर्ष आहे. मात्र दोन्ही नेत्यांच्या विनम्रतेचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे रतन टाटा यांनीही नारायण मूर्ती यांच्या विनम्रतेची स्तुती केली आहे. रतन टाटा यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. इन्स्टा स्टोरीवर व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे, "माझे जवळचे मित्र नारायण मूर्ती यांच्या हस्ते पुरस्कार घेताना मला अतिशय आनंद झाला."
टाटा कुटुंब आणि मूर्ती कुटुंब यांचा फार जुना परिचय आहे. त्यावेळी जेआरडी टाटा हे 'टाटा'चे अध्यक्ष होते आणि इन्फोसिसची स्थापनाही झालेली नव्हती. इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये झाली होती. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी पहिली नोकरी टाटा मोटर्समध्ये केली होती. त्या टाटा मोटर्सच्या पहिल्या महिला इंजिनिअर होत्या.
सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचा विवाह 1978 मध्ये झाला होता. सुधा मूर्ती यांनी जेआरडी टाटा यांना पत्र लिहून महिलांना नोकरी दिली जात नाही याबाबत तक्रार केली होती. या घटनेचा उल्लेख त्यांनी आपल्या 'द लास्टिंग लेगसी' या पुस्तकात केला होता. त्यावेळी मुलींच्या शिक्षणाबाबत फारशी जागरुकता नव्हती. शिवाय मुली शिकल्या तर त्या इंजिनिअर बनतील, अशा घटनाही दुर्मिळ होत्या. केवळ मुलंच इंजिनिअर बनू शकतात, तर मुली गणित वगळता इतर विषयांमध्येच पास होऊ शकतात.
सुधा मूर्ती 600 विद्यार्थ्यांच्या बॅचमधील एकमेव मुलगी आणि टॉपर होत्या. टाटा मोटर्स जे टेल्को नावानेही ओळखलं जातं, तिथे इंजिनिअर पदाच्या जागा निघाल्या होत्या, पण मुलगी असल्याने त्यांची निवड झाली नव्हती. याची तक्रार त्यांनी जेआरडी टाटा यांना पत्र लिहून केली होती. मग काय, टाटाकडून त्यांना बोलावणं आलं आणि विशेष मुलाखत घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांना टाटा मोटर्सची पहिली महिला इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली.
सुधा मूर्ती पूर्वाश्रमीच्या सुधा कुलकर्णी. 1978 मध्ये नारायण मूर्ती यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 1981 मध्ये त्यांनी इन्फोसिसची स्थापन केली. त्याच वर्षी सुधा मूर्ती यांनी नोकरी सोडली. यानंतर त्यांनी आपला निर्णय जेआरडी टाटा यांना सांगितला, तेव्हा टाटांनी सुधा मूर्ती यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुधा मूर्ती : रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांच्यातील भावनिक नात्याचा दुवा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2020 03:53 PM (IST)
रतन टाटा आणि नारायण मूर्ती कॉर्पोरेटमधील दोन दिग्गज एका मंचावर एकत्र आले आणि दोघांमधील भावनिक नातं जगाला दिसून आलं. टायकॉन अवार्ड सोहळ्यात रतन टाटा यांना नारायण मूर्ती यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी मूर्ती यांनी टाटा यांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले. हा क्षण भारतीय कॉर्पोरेट विश्वातील परस्पर आदर आणि संस्कृतीचं दर्शन घडवून गेला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -