मुंबई : नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील गोपाळखडी शासकीय आश्रमशाळेत नववी इयत्तेत शिकणार्‍या 15 वर्षीय चंद्रभागा मोहन चौरे या आदिवासी विद्यार्थिनीवर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. गुरुवारी मुंबईच्या केईएम रुग्णालयात आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य वाहिनी योजनेच्या अंतर्गत तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.


आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेच्या विकासासाठी देण्यात येणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून दोन लाख 85 हजार रुपये खर्च करत चंद्रभागावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. चंद्रभागाच्या आजाराचे वेळीच निदान झाल्याने चंद्रभागाच्या पालकांनी या योजनेविषयी आभार व्यक्त केले.

दीड वर्षांपूर्वी अटल आरोग्य वाहिनीमार्फत करण्यात आलेल्या आरोग्य चाचणीत चंद्रभागाला हृदयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. यावेळी चंद्रभागेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तवाहिनी दबलेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे  हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता. चंद्रभागेला श्वास घेण्यास खूप त्रास सहन करावा लागत होता.

अटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून चंद्रभागाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यावेळी उपचार करण्यासाठी गंभीर शस्त्रक्रिया करण्याचे समजल्यावर चंद्रभागाचे पालक उपचारासाठी तयार नव्हते. मात्र अटल आरोग्य वाहिनीच्या डॉक्टरांनी चंद्रभागाच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. अखेर तिचे पालक शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार केले. अशी माहिती अटल आरोग्य वाहिनीचे शाळा आरोग्य सहाय्यक व्यवस्थापक डॉ. किरण केदार यांनी दिली.

मुंबईतील केईएम रुग्णालयात 26 डिसेंबर रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चंद्रभागेची तपासणी करण्यात आली. आजाराचे निदान झाल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी चंद्रभागेला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी चंद्रभागेवर अँजिओग्राफी करण्यात आली.

चंद्रभागेचे वय अवघे 15 वर्षे असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे जोखीमपर होते. मात्र अटल तज्ज्ञ डॉक्टरांकडून चंद्रभागेच्या आजाराचे वेळीच निदान झाल्याने केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना चंद्रभागेवरील उपचारपध्दती सुयोग्यरीतीने हाताळण्यास पुरेसा वेळ मिळाला. 20 फेब्रुवारी रोजी चंद्रभागेच्या हृदयावर तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत दबलेल्या रक्तवाहिनीत स्टेन टाकण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे चंद्रभागेला आता श्वास घेण्यास कोणताही अडथळा येत नसून तिची प्रकृती स्थिर आहे.

चंद्रभागेच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा संपूर्ण खर्च हा आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येणाऱ्या निधीतून करण्यात आला.